विश्वशांती’ व्हावी ही विश्वनियंत्याचीच इच्छा आहे. त्यासाठी प्रथम जगत्कल्याण होणे आवश्यक आहे आणि जगत्कल्याण म्हटले, की त्यात मानवकल्याण हे अंतर्भूत असणारच. हे मानवी कल्याण वेळोवेळी त्याच्याच प्रेरणेने जन्माला येणाऱ्या एखाद्या मानवी माध्यमातून ईश्वर घडवीत असतो. असे ईश्वरप्रेरित मानवकल्याणाचे कार्य करण्यासाठी श्री. दत्तात्रय भास्कर भागवत ऊर्फ श्री सद्गुरुनाथ दादा यांचा जन्म पौष अमावास्या, दि. ६ फेब्रुवारी, १९२१ रोजी सातारा येथे परंपरागत दत्तभक्ती असलेल्या भागवत कुटुंबात झाला. वंदनीय दादांच्या माध्यमातून स्थापित झालेला ‘गुरुमार्ग’ हा मानवी जीवनाच्या उध्दारार्थ निर्माण झालेला अद्वितीय असा मार्ग आहे. ह्या गुरुमार्गात दत्तपंथ, नाथपंथ, सूफिपंथ या पंथांचे सार आहे.
वंदनीय दादांचे गुरु हे शिरडीचे प्रसिध्द संत जगत्गरु श्री साईनाथ महाराज होते. त्यांच्या मार्गदर्शनानुसार वंदनीय दादांनी मानवी कल्याणाचे हे कार्य स्थापित केले.
कार्यात योगदान देणारे सर्व दिव्यपूण्य विभूतींची श्री साई अध्यात्मिक समिती ही १९५६ साली अस्थित्वात आली.
प्रसिध्द सूफि संत परमपूज्य हाजी मलंगबाबा (कल्याण), परमपूज्य मोहम्मद जिलानीबाबा (बगदाद), परमपूज्य सलिम चिस्तीबाबा (फतेहपूर सिक्री), परमपूज्य अजमेर शरीफबाबा (अजमेर), परमपूज्य ख्वाजा बंदे नवाजबाबा (गुलबर्गा), परमपूज्य कुतुबुद्दीनबाबा (दिल्ली) या सर्वांनी कार्यासाठी आपले योगदान दिले आहे. तसेच नाथपंथीय श्री गोरक्षनाथ (बत्तिस शिराले), दत्तपंथीय श्री नृसिंहसरस्वती (नरसोबा वाडी) व श्री पंतमहाराज (बाळेकुंद्री) यांचा सुध्दा कार्यास मोठ्या प्रमाणात हातभार लागला आहे.
दुःख निवार्णार्थ कार्यातील दोन महत्वाची तत्वें अशी आहेत की,
(१) दुःखापेक्षा दुःख निर्माण करणारी कारणे जाणून घेणे अधिक महत्वाचे असून त्यांचे निर्मूलन होणे गरजेचे आहे.
(२) जसे ज्ञान अज्ञानाने आपले दुःख निर्माण करण्यास आपणच जबाबदार असतो, त्याचप्रमाणे त्यांना दूर करण्याचे ज्ञानही आपणच प्राप्त करुन घेतले पाहिजे.
वरील तत्वांवर आधारीत वंदनीय दादांनी तीन विमोचने सिध्द केलीत. ती म्हणजे वंशविमोचन, कर्मविमोचन, ऋणमोचन. तसेच त्यांनी उपासना, नामस्मरण, अनुग्रह, गुरु, कारण अशा पाच दिक्षा सिध्द केल्या आहेत.
मानवी कल्याणासाठी त्यांनी श्री शक्तीपीठ व श्री साई स्वाध्याय मंडळाची स्थापना केली.
मानवी जीवनाच्या विकासासाठी ॐकार साधना, आरती साधना व मुलाखत साधना अशा माध्यमांची निर्मिती त्यांनी केली. कमी वेळ व कमी खर्च लागणारी देवताजर्नाची पध्दती त्यांनी सूचित केली. खर्चीक विधींच्या ऐवजी, सर्वसामान्याना जीवनात जे साध्य करावयाचे आहे ते गुरुकृपाशीर्वादाने करता येते, हा महत्वाचा सिध्दांत कार्यात आहे. आपल्याला प्राप्त झालेल्या ज्ञानावर व अनुभवावर आधारीत वंदनीय दादांनी दुःख निवारणार्थ, ‘कामकाज’ हे साधन निर्माण केले.